20 हजार 186 अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरतीची मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा!! । Maharashtra Anganwadi Recruitment 2023
Maharashtra Anganwadi Recruitment 2023
Maharashtra Anganwadi Recruitment 2023
राज्यात अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या 20 हजारांपेक्षा अधिक पदांच्या भरतीला मान्यता मिळाली असून लवकरच ही भरती सुरु करण्यात येईल. त्याशिवाय मानधनवाढीसह नवीन मोबाईल, विमा, अंगणवाड्यांसाठी वर्ग आदी विषयांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले.
राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज ‘वर्षा’ निवासस्थानी बैठक घेण्यात आली. महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, एकात्मिक बालविकास सेवा आयुक्त रुबल अग्रवाल यांचेसह महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटना-समितींचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या एकरकमी लाभ योजनेसाठी एलआयसीकडे शासनाने 100 कोटी रुपये उपलब्ध करुन दिले आहेत. या संदर्भातील प्रलंबित प्रकरणांवर तात्काळ कार्यवाही करुन संबंधितांना पैसे देण्यासाठी भारतीय जीवन विमा महामंडळाकडे पाठपुरावा करण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिल्या.
अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या 20 हजार 186 पदांच्या भरतीला मान्यता मिळाली असून ही भरती प्रक्रिया सहा महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.अंगणवाडी केंद्रासाठी सध्या अस्तित्वात असलेले वर्ग आणि भाड्याने घेतलेले वर्ग याचा आढावा घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी विभागाला दिल्या. आढाव्यानंतर महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रातील शाळांमध्ये हे वर्ग भरविण्याच्या संदर्भात त्यांना आदेश देण्यात येतील, असेही त्यांनी सांग़ितले. कोविड काळात केलेल्या उल्लेखनीय सेवेबद्दल अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जाहीर केलेला प्रोत्साहन भत्ता लवकरच देण्यात येईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
दिवाळीपूर्वी सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासनाने भाऊबीज दिल्याबद्दल आणि गणवेशाचे पैसे थेट खात्यावर जमा केल्याबद्दल अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले. या बैठकीत पोषण ट्रॅकर ॲप, मानधनवाढ, रिक्त पदे आदी बाबींवर चर्चा करण्यात आली.
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.